मतदार पुनरीक्षण मोहिमेसाठी गंगापूर तहसील प्रशासनाची रात्रंदिवस धावपळ

Foto
तहसीलदार यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रात्री १० वाजेपर्यंत काम सुरू

: गंगापूर, (प्रतिनिधी) मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गंगापूर तहसील प्रशासनाकडून मतदार यादी करण्यासाठी अद्ययावत युद्धपातळीवर काम सुरू आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) रात्रंदिवस परिश्रम घेताना दिसून येत आहेत. मतदार पुनरीक्षणाची प्रक्रिया वेळेत आणि अचूकपणे पूर्ण व्हावी, यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नियमित कार्यालयीन वेळेनंतरही काम करत आहेत.

अनेकदा रात्री उशिरापर्यंत, सुमारे १० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मतदारांच्या नोंदी तपासणे, आवश्यक दुरुस्त्या करणे, नवीन मतदारांची नोंदणी तसेच नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार सचिन वाघमारे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार मोरे, यांच्यासह संपूर्ण तहसील प्रशासन या मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाले असून, मतदार पुनरीक्षणाचे काम अधिक अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. प्रशासनाच्या या कामाचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

मतदार पुनरीक्षणाची प्रक्रिया प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच सर्व बीएलओ पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. नागरिकांनीही या मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करून आपली मतदार यादीतील नोंद तपासावी आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती अथवा नवीन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. पात्र नागरिकांचा एकही मतदार म्हणून नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की लवकरच लवकर आपली नोंद करून घ्यावे.

- नवनाथ वगवाड, तहसीलदार, गंगापूर